सांगली-आष्टा-पेठ रस्ता कामामुळे आष्टा नगरपालिकेच्या पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन लिकेज होऊन ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले. पाईपलाईन लिकेजमुळे काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. नागरिकांचे पाण्यासाठी हाल झाले. पेठ-आष्टा-सांगली या राष्ट्रीय महामार्गाचे काम आष्टा शहरात अंतिम टप्प्यात चालू आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला शहराचा विस्तार वाढला आहे. गांधीनगर येथील टाकीतून शहरातील बहुतांश भागात पाणी पुरवठा होतो. त्यासाठी महामार्ग रस्ता क्रॉस करावा लागतो. हा धोका ओळखून सुरवातीला काम चालू असताना नगरपालिकेच्या वतीने अंडरग्राउंड पाईपलाईनचे काम मजबूत करण्यात आले होते.
रस्ता क्रॉस करण्याच्या ठिकाणी खुदाई करण्यात आली. यावरती काँक्रीट ओतण्यात आले. खुदाई दरम्यान पाईपलाईनला लिकेज झाले. आज पहाटे पाणीपुरवठा सुरू केला असता नव्याने काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या भागांमध्ये पाण्याचे फवारे उडू लागले. जसजसे पाण्याचे प्रेशर वाढत राहील तसतसा नवीन केलेला रस्ता पूर्ण उखडला गेला. पाईपलाईन फुटून सर्व पाणी रस्त्यावरती वाहू लागले. काही नागरिकांनी हा व्हिडिओ करून नगरपालिका अधिकाऱ्यांना पाठवला. पालिका प्रशासनाने एक तासानंतर पाणीपुरवठा बंद केला. ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले.
पाईपलाईन लिकेजमुळे शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. नागरिकांची पाण्यासाठी धावपळ उडाली. पालिकेने २४ तासात लिकेज काढून तात्काळ पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.