इचलकरंजी येथे बेकायदेशीरित्या चारचाकी वाहनातून वाईन शॉपमधून हॉटेलमध्ये विक्रीसाठी नेण्यात येत असलेला दारूचा साठा पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे यांच्या पथकाने पकडला आहे. या प्रकरणी दिग्विजय उर्फ विजय दिलीप पांढरपट्टे याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एकूण ५,४४,८६०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ज्यामध्ये विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या ७२० बाटल्या, मोबाईल आणि एक शेव्हरलेट कंपनीची चारचाकी वाहन यांचा समावेश आहे.
पोलिस उपअधिक्षक कार्यालयाकडील पथकातील परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षक अरविंद रायबोले, पोहेकॉ सुनिल पाटील, संजय हारगुले, पोकॉ ताहिर शेख, कट्टी यांना पोलिस उपअधिक्षक साळवे यांनी अवैध धंद्यावर कारवाईच्या अनुषंगाने सूचना केल्या होत्या. त्यानुसार या पथकाकडून शिवतीर्थ ते डेक्कन चौक या मार्गावर गस्त सुरु असताना डेक्कन चौक परिसरातील हॉटेल जलजासमोरुन जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कारचा संशय आल्याने पथकाने त्याला थांबविले. त्यावेळी कारची तपासणी केली असता आतमध्ये संशयास्पद बॉक्स निदर्शनास आले. याप्रकरणी पथकाकडून केलेल्या चौकशीत विजय पांढरपट्टे याने हा माल विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले.
