इचलकरंजी, मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोघांनी कोयता आणि चाकूने केलेल्या हल्ल्यात दोघेजण जखमी झाले. ही घटना महात्मा गांधी पुतळा चौकात शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.
निखिल पाटील व सचिन कोतमिरे अशी जखमींची नांवे आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम गावभाग पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत सुरु होते. याबाबत
मिळालेली माहिती अशी, निखिल पाटील व सचिन कोतमिरे हे दोघेजण दुपारच्या सुमारास महात्मा गांधी पुतळा परिसरातील सहवास कट्ट्यावर बोलत बसले होते.
त्याचवेळी त्याठिकाणी आलेल्या दोघांनी मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन वाद घालण्यात सुरुवात केली. शब्दाला शब्द वाढत असतानाच त्या दोघांनी कोयता आणि चाकूने सचिनवर वार केला. त्यावेळी निखिल हा मधे आल्याने त्याच्यावरही वार करण्यात आले.दोघांच्याही डोक्यावर व हातावर वार झाले असून वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने काही काळ तणाव निर्माण झाला होता. नागरिक जमा होऊ लागल्याचे पाहताच हल्लेखोरांनी तेथून पलायन केले.
तर जखमींना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच गावभागचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी पथकासह रुग्णालयात जात माहिती घेतली. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम गावभाग पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
