हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीसह परिसरातील अलाटवाडी, इंगळी, तळंदगे, सांगवडे, वसगडे, सांगवडेवाडी, हलसवडे आदी भागात रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी रंगाची उधळण करीत अवघा तरुणवर्ग रंगात न्हाऊन निघाला. मोठ्या प्रमाणात रंगपंचमी खेळत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळाले. सकाळी ७ वाजल्यापासूनच बालचमूंच्या उत्साहाला उधाण आले होते.
बालचमूंसह युवकांनी व महिलांनी रंगाची मुक्तपणे उधळण केली. अनेक गल्लीमध्ये व चौकामध्ये नागरिक रंगात न्हाऊन निघाले. काही परिसरात अबालवृद्धही रंग खेळताना दिसून आले. रंगपंचमीचा आनंद आनंदाने लुटला. यावेळी ठिकठिकाणी रंगाचा खच पडला होता. रंगपंचमीमुळे सर्वत्र चैतन्याचे व आनंदाचे वातावरण पसरले होते.
