हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाईपलाईनचे खुदाईचे सुरू असलेले काम रविवारी सकाळी माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी बंद पाडले. तारदाळ व खोतवाडी दोन्ही गावाकरिता ५३ कोटी रुपयाची योजना मंजूर झालेली आहे. सदर योजनेचे काम दोन वर्षे उलटूनही पूर्ण न झाल्याने नागरीकांतून संतम प्रतिक्रिया उमटत आहे. दानोळी मधून तारदाळ फिल्टर हाऊसकडे जाणान्या मेन पाईपलाईनचे काम न करता संबंधीत मक्तेदाराने मनमानी करीत तारदाळ खोतवाडी अंतर्गत पाईपलाईन खुदाईचे काम सुरु केले. त्यामुळे गावातील अनेक रस्त्याची चाळण झाली आहे. अशातच सध्या तारदाळ-शहापूर रस्त्यालगत पाईपलाईन खुदाईचे काम सुरू करून रस्त्याची दुरवस्था केली जात आहे.
ही समस्या लक्षात घेत माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे, सचिन पवार यांनी सुरू असलेले खुदाईचे काम रविवारी सकाळी बंद पाडले. तसेच मेन पाईप लाईनचे काम पुर्ण झाल्याशिवाय गावातील अंतर्गत पाईप खुदाईसाठी एक इंचही जागा खुदाई करू देणार नाही असा इशारा संबंधितांना दिला. सदरच्या योजनेचे काम मागील वर्षभरापासून संथगतीने सुरू आहे त्यामुळे याचा नाहक त्रास तारदाळ-खोतवाडी मधील नागरीकांना सोसावा लागत आहे. ही योजना मार्च २०१५ अखेर पूर्ण होणे गरजेचे होते तरी देखील संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने व संबंधीत मक्तेदार यांच्या मनमानी कारभारामुळे संबंधीत योजना बारगळली असल्याचे चित्र दिसत आहे.