हातकणंगले येथे गाडी ओव्हरटेक केल्याच्या रागातून एकास मारहाण; दोघांवर गुन्हा

गाडी पुढे घेतल्याचा राग मनात धरून रिव्हॉल्वरच्या उलट्या बाजूने मारहाण करून शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी जखमी केल्याची घटना हातकणंगले तालुक्यातील नेज – शिवपुरी येथे शुक्रवार दुपारी घडली. बबलू उर्फ यासीन मुल्ला व साहिल दस्तगीर तासीलदार अशी मारहाण केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबतची फिर्याद विशाल वसंत खोत यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली आहे. याबद्दल अधिक माहिती अशी की, कुंभोज येथील विशाल खोत हे (एम. एच. ०९ सी.यु. ३२६६) हे वाहन शिरोलीकडे भाड्यासाठी घेऊन जात होते.

यावेळी शिवपुरी येथील पाण्याच्या टाकीजवळ काळ्या रंगाची थार गाडी (एम. एच. ५१ ए. ५५९५) ही बाहुबलीकडून हातकणंगलेच्या दिशेने जात असताना फिर्यादी विशाल खोत यांनी थार गाडीला ओव्हरटेक केले. हाच राग मनात धरून थार गाडीतील संशयित आरोपी कारचालक बबलू उर्फ यासीन मुल्ला याने त्याच्या कमरेची रिव्हॉल्वर काढून उलट्या बाजूने खोत यांच्या डोक्यात मारली. त्याच्यासोबत असलेला साहिल तासिलदार यांनेही शिवीगाळ करत लाथाबुक्याने मारहाण केली. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून पुढील तपास स.पो.नि. सुनील माने करीत आहेत.