हातकणंगले तालुक्यातील आळते हद्दीतील इंडो काऊंट या मिल मधील कामगार त्यांच्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने त्यांचा हक्क मागत आंदोलन करत आहेत. कंपनी प्रशासना कडून प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीतील जवळपास दोनशे कामगारांनी कंपनीच्या प्रवेश द्वारालगत ठिय्या आंदोलन चालू केले. मात्र लोकशाही मार्गाने चालू असलेले आंदोलन हातकणंगले पोलिस प्रशासनाकडून बळजबरीने दडपण्याचा प्रयत्न चालू असल्याचा आरोप माजी पंचायत समिती उपसभापती प्रविण जनगोंडा व पत्रकार परिषदेत आंदोलनकर्त्या कामगारांनी हातकणंगले येथे आयोजीत पत्रकार परीषदेत केला.
प्रविण जनगोडा म्हणाले, आळते हद्दीतील इंडो काउंट या मिल कंपनीतील सुमारे दोनशे स्थानिक कामगार आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी लोकशाही पद्धतीनें आंदोलन करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून निवेदन बैठकांच्या माध्यमातून कामगार व कामगार प्रतिनिधींनी आपल्या मागण्या मिल प्रशासनाला कळवल्या होत्या परंतु मिल प्रशासनाने याकडे सोयीस्कर केल्याने स्थानिक कामगारांनी काम बंद आंदोलन केले आहे.
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कामावर न हजर राहण्याचा पवित्रा स्थानिक कामगारांनी घेतला आहे.आपल्या न्याय मागण्यांसाठी कामगारांचे आंदोलन कायदेशीरपणे व शांततेत करत असताना पोलीस प्रशासनाकडून चालू असलेली दादागिरी खपवून घेणार नाही असे म्हणत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील असेही ते म्हणाले.
