मुख्यमंत्री शिंदेंची तोफ या दिवशी कोल्हापूर-हातकणंगलेत धडाडणार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघात मेळावे होणार आहेत.यामध्ये २९ जानेवारीला कोल्हापूर आणि ३० जानेवारीला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मेळावे होणार आहेत, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी येथे दिली.

ते म्हणाले, ”मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेतील मंत्री, वरिष्ठ पदाधिकारी यांची बैठक झाली. यात ‘शिवसंकल्प’ अभियानाद्वारे ६ जानेवारी २०२४ पासून राज्यभरात मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यभरातील जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय झाला.

बैठकीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. पहिले पाऊल जाहीर होत आहे. कुठली जागा कुठला पक्ष लढवणार, उमेदवार कोण, मतदारसंघ कोणाला सोडणार, याबाबत सारख्या अफवा विरोधकांकडून परसवल्या जात आहेत.यापुढेही पसरवल्या जातील. त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका.

आपण आपल्या सर्व जागा ताकदीने लढवूया, जिंकूया. आपली महायुती विजयी करुया. केलेल्या कामावर आपण मते मागूया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. त्याशिवाय शिवसंकल्प अभियानातील दौरे जाहीर केल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.’