विटा शहरातील यशवंतनगरमधील ६० प्लॉट धारकांनी शर्तभंग केलेली आहे. या सर्व प्लॉटधारकांना शासनाकडून लाखो रुपये दंडाच्या नोटीस आलेल्या आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी आमदार सुहास बाबर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी महसूल खात्याचे प्रमुख अधिकारी, भाजपचे ज्येष्ठ नेते अनिलआप्पा बाबर, दत्तात्रय तारळकर, गणेश चोथे आदी उपस्थित होते. यावेळी विटा शहरातील यशवंतनगरमधील शासकीय प्लॉटधारक भोगवटदार वर्ग २ मधून भोगवटदार वर्ग १ मध्ये होण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत आमदार बाबर म्हणाले, विटा शहरातील यशवंतनगर भागातील सुमारे १८५ प्लॉट गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना ६५ वर्षांपूर्वी वाटप करण्यात आले.
या प्लॉटधारकांनी नियमाप्रमाणे सरकार दप्तरी रक्कम भरली होती. आजअखेर सर्व नागरिक प्लॉटमध्ये आपापल्या ऐपतीप्रमाणे घरे बांधून राहत आहेत. परंतु प्लॉटधारकाकडून अनावधानाने शर्तभंग झाल्या आहेत. त्यामध्ये प्लॉट तारण देऊन कर्ज काढणे, प्लॉट हस्तांतरण करणे, प्लॉट भाडेतत्त्वावर देणे, व्यावसायिक वापर इत्यादी प्रकार झालेले आहेत. त्यामुळे संबंधित प्लॉटधारकांना शासनाकडून मोठ्या रकमा भरण्याच्या तसेच वसुलीच्या नोटिसा आलेल्या आहेत. त्यामुळे प्लॉटधारक भयभीत झाले आहेत. याबाबत आपण आज महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली.
हे प्लॉट भोगवटदार २ मधून भोगवटदार १ मध्ये परावर्तीत होण्यासाठी आपण विनंती केली. त्यामुळे विटा शहरातील यशवंतनगर भागातील शासकीय प्लॉट भोगवटदार २ मधून भोगवटदार १ मध्ये करण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. त्यावर महसूलमंत्र्यांनी प्लॉटचे कब्जेपट्टी झालेल्या दिवशीचा रेडिरेकनरचा दर किंवा शर्त भंग झाल्या दिवशीच्या रेडिरेकनर दरावर नजराणा भरून घ्यावा, असा निर्णय घेतला असल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले.
