मजरेवाडी येथील कृष्णा नळपाणी पुरवठा योजना व पंचगंगा नदीतून पाणी उपसा करून शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, कृष्णा नळपाणी पुरवठा योजना कालबाह्य झाल्याने वारंवार गळती लागते तर प्रदूषणाच्या कारणामुळे पंचगंगा नदीतून पाणी उपसा करण्यात निर्बंध येतात. त्याचा विपरीत परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होतो. इचलकरंजी शहरवासियांना उन्हाळ्यामध्ये होणारी पाण्यासाठी वणवण कमी करण्यासाठी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये बंद पडलेली ५७ बोअर सुरू करणे तसेच १६ बोअरमध्ये सबमर्सिबल पंप सोडणे अशी कामे घेतली असून यासाठी सुमारे १ कोटीचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
महानगरपालिकेच्या मालकीचे सुमारे ७५० हून अधिक बोअरींग आहेत. त्यातील बरेच बोअरींग विविध कारणांमुळे बंद स्थितीत आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागते. ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी धावाधाव होऊ नये यासाठी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने विविध कारणास्तव बंद असलेले ७९ बोअर सुरू करण्यासाठी निविदा प्रसिध्द केली आहे. १ कोटी खर्च अपेक्षित असून आम. राहुल आवाडे यांच्या आमदार फंडातून तसेच जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून हे काम सुरू करणेत येणार आहे.
याबाबतची वर्क ऑर्डर १५ मार्च पर्यंत निघेल असे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
त्याचबरोबर पंचगंगा नदीची पाईपलाईन aनव्याने टाकण्याच्या कामास सुरूवात केली जाणार आहे. शहरात टारे कॉर्नर ते जलशुध्दी केंद्रापर्यंत पाईनलाईन बदलण्यात येणार असून त्यासाठी ४ कोटी ९९ लाखांचा खर्च अपेक्षित धरला आहे.
