हातकणंगले, हातकणंगले येथील श्री लक्ष्मी इंडस्ट्रियल असोसिएशन (स्लिमा) ची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या हॉलमध्ये खेळीमेळीत पार पडली.प्रारंभी ‘स्लिमा’चे अध्यक्ष महेश दाते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मानद सचिव मिलिंद पाटील यांनी असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेतला तर सचिव अजय मनवाडे यांनी नोटीस वाचन केले. सभेपुढील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी अध्यक्ष डॉ. महेश दाते बोलताना म्हणाले, गेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्व संचालकांनी व सभासदांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे असोसिएशनच्या प्रगतीसाठी राबवलेल्या उपक्रमांना आपला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हीच आमची खरी ताकद होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वसाहतीमधील अंतर्गत रोड डांबरीकरणाचे काम माझ्या कार्यकाळामध्ये पूर्ण झाले याचा मला अभिमान वाटतो.
‘स्लिमा’ चे नूतन अध्यक्ष तुषार कुलकर्णी बोलताना म्हणाले, पुढील काळामध्ये आपल्यासमोर अनेक नवी आव्हाने आहेत. तांत्रिक बदल, स्पर्धात्मक बाजारपेठ, जागतिक पातळीवरील नवी मागणी आणि पर्यावरण पूरक उत्पादनाच्या वाढत्या गरजा या सगळ्याचा विचार करून आपण अधिक नाविन्यपूर्ण धोरण आखू, उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करू तसेच सरकारी यंत्रणांशी सातत्याने संवाद साधून धोरणात्मक सुधारणा घडवून आणू. यावेळी अॅड. सुदत्त गुळवणी, सी.ए. विनय झंवर यांचे जीएसटी व बिझनेस स्ट्रॅटजी या विषयावर मार्गदर्शन लाभले. या सभेकरिता लक्ष्मी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अनिल कुडचे, मुबीन जमादार, अजित केटकाळे यांच्यासह सर्व पदाधिकारी, संचालक, सभासद उद्योजक उपस्थित होते. राजीव गोलंगडे यांनी सूत्रसंचालन केले. आभार कार्याध्यक्ष आकाश मुधाळे यांनी मानले.
