अँड. वैभव पाटील यांची नाथाष्टमीपूर्वी विट्यातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

विटा शहरातील अंतर्गत रस्त्यावर खड्ड्यांमुळे नागरिकांना तसेच वाहनधारकांना त्रास होत आहे. त्यामुळे नाथाष्टमीपुर्वी अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष अँड. वैभव पाटील यांनी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे, माजी नगरसेवक प्रशांत कांबळे, युवा नेते विनोद पाटील, भरत कांबळे, ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

विटा शहरातील अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. याबाबत शहरातील नागरिक माझ्याकडे सारखी तक्रार करत आहेत. आमच्या नगरसेवकांनी प्रशासनाला सुचना देण्यासाठी बैठक घेतली होती. यावेळी नगरपालिका प्रशासनाने त्वरित शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत ते भरून घेण्याबाबत सुचना द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

नाथाष्टमी सर्व विटेकर नागरिक मोठ्या उत्साहाने साजरी करतात. याकाळात नगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छता तसेच पाणीपुरवठा ही अखंडीत सुरू राहावा याबाबत ही मागणी करण्यात आली. या काळात शहरात हजारो भाविक येतात. रस्त्यांवर विविध स्टॉल उभारले जातात. त्यामुळे रस्ता अरुंद होतो त्यातच रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे पादचारी तसेच वाहनधारकांना त्रास होतो. त्याच बरोबरीने सध्या अवकाळी पाऊस चालू आहे पाऊसाचे पाणी खड्ड्यात साठल्याने वाहनधारकांना खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे तातडीने संबंधित प्रशासनाने त्वरित शहरातील रस्त्यांवरील खड्डे मुजवावेत अशी मागणी केली आहे.