लक्ष्मीनगर गाव हे शिरभावी पाणीपुरवठा योजना बंद झाल्यापासून गेले अनेक महिने झाले पाण्यासाठी वणवण करत आहे. पिण्याच्या पाण्याच्या सोयीपासून लक्ष्मीनगर गाव हे वंचित आहे. याची जाणीव लक्ष्मीनगरचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांना असतानासुद्धा जाणूनबुजून लक्ष्मीनगरच्या जनतेला त्रास देण्याच्या हेतूने याच्याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणून लक्ष्मीनगर गावच्या सरपंचांना पिण्याच्या पाण्याची सोय करता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी गावामध्ये चर्चा सुरू आहे.
जिल्हाधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी स्वतः लक्ष्मीनगर गावाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे गावच्या नागरिकांमधून बोलले जात आहे. गेल्यावर्षी लक्ष्मीनगर ग्रामपंचायतवरती महिलांनी घागरी घेऊन मोर्चा काढला होता. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते हे माहीत असूनसुद्धा सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना याचे गांभीर्य वाटले नाही. गेले अनेक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाहीत.
लक्ष्मीनगर येथील एका शेतकऱ्याने गावच्या नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत असलेले पाहून आपल्या शेतीला बाहेरून आणलेले पाणी गावातील गोरगरीब जनतेला देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे. परंतु कडक उन्हाळा आणि लाईटीचा लपंडाव चालू असल्यामुळे त्यांच्याच शेतीला पाणी कमी पडू लागले आहे. तरीपण तो शेतकरी अधूनमधून गावाला पाणी देऊन गावाची तहान भागवत आहे. लक्ष्मीनगर गावामध्ये जलजीवन योजनेचे काम काही महिन्यांपूर्वी चालू होते.
परंतु आजतागायत लक्ष्मीनगर गावाला पिण्याच्या पाण्याची सोय जलजीवन योजनेमार्फत लाखो रुपये खर्च करूनसुद्धा झालेली नाही. त्यातच शिरभावी पाणीपुरवठा योजना बंद आहे. यामुळे लक्ष्मीनगर गावच्या नागरिकांचे पिण्याच्या पाण्याविना गेले अनेक महिन्यांपासून हाल होत आहेत.