खो खो खेळातून पाच वेळा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा गाजवणारी सुवर्णकन्या कोमल लक्ष्मण शिंदे (रा. मंगरूळ ) हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे. कोमल शिंदे हिची खेळाडू कोट्यातून महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्याला खो खो खेळाची मोठी परंपरा लाभली आहे. तालुक्यातील मंगरूळ येथील योद्धा मंडळाच्या खेळाडूंनी आज पर्यंत राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. मंगरूळ गावच्या कोमल शिंदे हिने आत्तापर्यंत पाच वेळा राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तीन सुवर्णपदक आणि एक रौप्य पदक पटकावले आहे.
या कामगिरी बरोबरच तिने एमपीएससीच्या (MPSC) परीक्षेत खेळाडू कोट्यातील आरक्षणाच्या द्वारे महसूल सहाय्यक पदाला गवसणी घातली आहे. विट्यातील माजी राष्ट्रीय खेळाडू असलेले उपकोषागार अधिकारी मिलिंद वादवणे यांच्या हस्ते तिचा सत्कार झाला. याप्रसंगी खो खो प्रशिक्षक सम्राट शिंदे, सुभाष शिंदे, राष्ट्रीय खो खो खेळाडू मोनाली शिंदे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी खेळाबरोबरच अभ्यासाला सुद्धा तितकेच महत्त्व दिले पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सहज सामोरे जाता येते असे कोमल शिंदे हिने व्यक्त केले.