विट्यात नेचर केअर सन्मान राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा :

शेती आणि निसर्ग संवर्धन क्षेत्रात मुलभूत आणि भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना “नेचर केअर सन्मान” या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात येते. यावर्षी ” वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, जंगल निर्मिती  या विषयात काम करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींना ७ मे रोजी विटा येथे रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक जयदेव बर्वे आणि कामाक्षी बर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संचालक जयदेव बर्वे म्हणाले, नेचर केअर फर्टीलायझर्स या कंपनीच्या वतीने सामाजिक जाणीवेतून गेली दोन वर्षे पुरस्कार एका शानदार सोहळ्याद्वारे प्रदान केला जातो. दरवर्षीच्या सन्मानासाठी विविध संकल्पना राबवण्यात येतात. देशी बियाणे व वाण संवर्धन प्रसार तसेच तृणधान्य या क्षेत्रातील कार्याला यापूर्वी गौरवण्यात आले होते.

यंदाची मध्यवर्ती संकल्पना “वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, जंगल निर्मिती  ” ही आहे. या क्षेत्रात  गुणात्मक आणि अभिनव पद्धतीने काम करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्ती अथवा संस्थाची नामांकने मागविण्यात आली. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. यंदाच्या पुरस्कारासाठी जी निवड समिती गठित केली होती. त्यामध्ये आशिष वेले, पुणे ( कृषितज्ञ व पॉलिसी मेकर), अरुण नाईक, कोल्हापूर ( माध्यम तज्ञ), जयंत बर्वे (सेंद्रिय शेती तज), कामाक्षी बर्वे (उद्योजिका) यांचा सहभाग होता. या निवड समितीने अर्जदारांची मुलाखत व प्रत्यक्ष कामाची पाहणी यातून अंतिम  पुरस्कारार्थीची यादी जाहीर केली. त्यानुसार मुख्य पुरस्कार आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन, लातूर, जि. लातूर, वृक्ष संवर्धन समिती, बार्शी, जि. सोलापूर, चंद्रशेखर व शिवांगी दातार, संगमेश्वर, जि. रत्नागिरी, रोहन रक्षिता फाऊंडेशन, गोंदवले, जि. सातारा यांना प्रत्येकी ५१ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सर्व सामाजिक संघटना, कर्जत, जि. अहिल्यानगर आणि संकल्प वनराई, छ. संभाजीनगर, जि. छ. संभाजीनगर या दोन संस्थांमध्ये विभागून ५१ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह अशा मुख्य पुरस्कारांचे वितरण होईल. 

वृक्षारोपण वृक्ष संवर्धन आणि जंगल निर्मिती या क्षेत्रात काम केलेल्या गावच्या लेकीचं झाड, करकंब, जि. सोलापूर, निसर्गप्रेमी मित्र मंडळ, पेठ वडगाव, जि. कोल्हापूर आणि प्रा. आर. के. पाटील, बिद्री, जि. कोल्हापूर यांना प्रत्येकी २१ हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह देऊन उत्तेजनार्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेले डॉ. अंकुर पटवर्धन, पुणे यांना ५१ हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याद्वारे एकूण दहा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्यास नैसर्गिक शेतीचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र भट तसेच महाराष्ट्रातील पर्यटन विभागातील ब्रँड अँबेसिडर आणि प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण ७ मे रोजी विटा येथे होणार आहे, अशी माहिती जयदेव बर्वे आणि कामाक्षी बर्वे यांनी दिली आहे. याप्रसंगी नेचर केअरचे व्यवस्थापक अमृत कुलकर्णी, अनिरुद्ध बर्वे उपस्थित होते.