आरफळ कालव्याच्या सध्या सुरु असणाऱ्या सन २०२४- २५ मधील उन्हाळी हंगाम पाण्याच्या आवर्तनास १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
आरफळ कालव्याचे उन्हाळी हंगाम पाण्याचे आवर्तन ११ मे रोजी संपणार होते. तथापि, आरफळ कालव्याच्या शेवटच्या भागातील व विसापूर- पुणदी योजनेच्या लाभक्षेत्रामधील लाभधारकांची यासंदर्भातील मागणी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तातडीने निदर्शनास आणून दिली व साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांचेशी याबाबत समन्वय ठेवला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही याची तात्काळ दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांचेशी उन्हाळी आवर्तन सुरु ठेवण्याबाबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली.
तसेच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी समन्वय ठेवला. या चर्चेच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले तसेच तारळी व आरफळ प्रकल्पाचे क्षेत्रीय अधिकारी यांना तळी प्रकल्पातून सांगली जिल्ह्याकरिता आरफळ कालव्यामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी सोडणेबाबत सूचना दिल्या. अशाप्रकारे १५ मे पर्यंत उर्वरित ०.११ टीएमसी ऐवजी ०.२१ टीएमसी पाणी विसापूर- पुणदीच्या उर्वरित भागास उपलब्ध होणार आहे. आरफळ कालव्याचे सध्या सुरु असणारे उन्हाळी हंगाम पाण्याचे आवर्तन ११ मे रोजी संपणार होते. त्यामुळे लाभधारकांकडून उन्हाळी आवर्तन सुरु ठेवावे अशी मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने सांगली जिल्ह्यातील आरफळ कालवा व विसापूर- पुणदीच्या लाभधारकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
