शिक्षक भारती संघटनेने माजी आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात सादर केलेली सावित्री फातिमा कॅशलेस कुटुंब आरोग्य योजना शिक्षकांच्यासह सर्व शासकीय कर्मचारी यांना लागू करावी, या मागणीसाठी शिक्षक भारती संघटनेने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची शिक्षक भारती जिल्हा सरचिटणीस ‘कृष्णा पोळ, जत तालुका अध्यक्ष दिगंबर सावंत, शिक्षक भारती कोल्हापूरचे शिक्षकनेते सचिन पाटील, अरूणसिंह पाटील यांनी भेट घेत निवेदन दिले. सदरच्या मागतीबाबत मंत्री महोदय यांनी सकारात्मक चर्चा केली.
या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षक शिक्षकेत्तरांना वैद्यकीय बिलांच्या प्रतिपूर्तीची रक्कम मिळवण्यासाठी शासकीय रुग्णालय, शिक्षण विभाग ते मंत्रालयापर्यंत खेपा घालाव्या लागतात. स्वतः अथवा घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा अपघात झाला तर स्वखर्चाने उपचार घ्यावे लागतात. हॉस्पिटलचा खर्च मोठा असेल तर वेळप्रसंगी कर्ज घ्यावे लागते. उसनवारी करावी लागते. उपचार पूर्ण झाल्यानंतर हॉस्पिटलमधून सर्व कागदपत्रे जमा करुन वैद्यकीय प्रतिपूर्तीचा प्रस्ताव तयार करून शासकीय रुग्णालयात जमा झाल्यावर प्रस्तावाची छाननी केली जाते. प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी स्वतः जावे लागते. तीन ते चार वेळा खेपा घातल्यावर सातत्याने पाठपुरावा केल्यावर प्रस्ताव मंजूर होतो. वैद्यकीय उपचारासाठी खर्च झालेली शंभर टक्के रक्कम मिळेलच असे नाही.
शासकीय रुग्णालयात झालेल्या खर्चाच्या रकमेत कपात केली जाते. जेवढी कपात होते तेवढे आपले आर्थिक नुकसान होते. शासकीय रुग्णालयात मंजूर झालेला प्रस्ताव नंतर शिक्षण विभागाकडे सादर केला जातो. शिक्षण विभागाने मंजूर केल्यानंतर वैद्यकीय प्रतिपूर्तीचे बिल सादर करावे लागते. वेतन विभाग उपलब्ध निधीनुसार बिल मंजूर करते. आणि मग एवढा सर्व प्रवास करुन आपली रक्कम पुन्हा आपल्या खात्यात येते. या सर्व प्रक्रियेसाठी कधी कधी एक वर्ष लागते. वैद्यकीय बिल पाच लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या बिलाचा प्रस्ताव मंत्रालयापर्यंत जातो. मंत्रालयात बिल गेल्यानंतर किती वर्ष लागतील सांगता येत नाही. या सर्व त्रासाला कंटाळून शिक्षक, शिक्षकेत्तर बहुतांश वेळा वैद्यकीय बिल सादर करत नाहीत. तर अनेक शिक्षक शिक्षकेत्तरांनी मेडिक्लेम पॉलिसी काढलेली आहे. या मेडिक्लेम पॉलिसीच्या हफ्त्यापोटी वार्षिक पंधरा ते वीस हजार रुपये भरावे लागतात. तरी शिक्षक भारतीने सादर केलेली कॅशलेस कुटुंब आरोग्य योजना मंजूर करून आपल्या सर्वांची या त्रासातून मुक्तता करावी