आष्टा, नगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांच्या ठिकाणी नागरिकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने राजकीय श्रेयासाठी लावलेले अनाधिकृत फलक काढण्याचा अल्टीमेटम देऊनही पालिका प्रशासनाने कार्यवाही केली नाही. याविरोधात आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवक अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले यांच्या नेतृत्वाखाली संतप्त समर्थकांनी आष्टा नगर पालिकेवरती राष्ट्रवादी शरद पवार पक्ष संपर्क कार्यालय असा फलक लावून निषेध केला.
राष्ट्रवादी समर्थकांनी पालिकेबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत राडा केला. अधिकाऱ्यांना धारेवर धरित बेशिस्त कारभारावरून प्रश्नांची सरबत्ती करीत जाब विचारले. अधिकारी यांनी विकास कामे शासनाच्या माध्यमातून झाली असल्याचे सांगत याबाबत आठ दिवसात वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. मात्र आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास आज नामकरण केले. आठ दिवसानंतर पालिकेला कुलूप ठोकू असा इशारा शिवाजीराव चोरमुले यांनी पालिका अधिकारी व पोलीस प्रशासनापुढे दिला. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पालिकेवर राजकीय पक्षाच्या नावाचा फलक लागल्याने शहरात या घटनेची जोरदार चर्चा होती. आष्टा शहरात नगरपालिकेच्या वतीने झालेल्या विकास कामांचे डिजिटल फलक लावून काहीजण राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत हे सर्व फलक अनाधिकृत आहेत नगरपालिका प्रशासनाने हे फलक तात्काळ काढून घ्यावेत अशी मागणी काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली होती. संतप्त समर्थकानी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष जनसंपर्क कार्यालय असा फलक नगरपालिकेवरती नगरपालिका अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या समोरच लावला. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे, बाबासो सिद्ध, प्रकाश रुकडे, सयाजी गावडे. सुनील माने, सतीश माळी, राजकेदार आटूगडे, शशिकांत भानुसे, राजू माने, अनिल पाटील, उषा विरभक्त, प्रकाश सिद्ध, सोमाजी डोंबाळे, प्रभाकर जाधव, भीमराव माने, दीपक ढोले, उदय मोटकट्टे यांच्यासह समर्थक उपस्थित होते.
