आम. आवाडेंकडून आयजीएम प्रशासन धारेवर 

इचलकरंजी, येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयसंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन आमदार राहुल आवाडे यांनी थेट रुग्णालय गाठले. त्याचवेळी त्याठिकाणी टेक्निशियन नसल्याने डायलेसीस विभाग बंद असल्याचे आणि जखमी झालेली महिला उपचारासाठी दाखल होऊन २४ तास झाले तरी प्राथमिक उपचारही केले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार आवाडे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

 
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नागरिकांना अत्याधुनिक सेवा- सुविधा मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशिल असताना प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल तक्रारीही होत आहेत. त्याची दखल घेऊन आमदार आवाडे यांनी रुग्णालय गाठले असता तेथे टेक्निशियन नसल्याने २ दिवसांपासून डायलेसीस विभाग बंद असल्याचे त्याचबरोबर २४ तास उलटूनही खुर्चीवरुन पडुन जखमी झालेल्या महिलेवर प्राथमिक उपचारही केले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडे विचारणा करता दोन दिवस सकाळ आणि दुपार सत्रात डॉक्टरही फिरकले नसल्याचे सांगितले. त्यामुळे आमदार आवाडे यांनी डॉक्टरांच्या हजेरीबाबतच्या नोंदी मागवल्या असता त्यामध्ये डॉक्टर थम करत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आमदार आवाडे यांनी प्रशासनाला धारवेर धरले. तसेच रुग्णालयात सुविधांसाठी स्वत: जिल्हाधिकारी आणि शासनाकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, आवश्यक कागदपत्रेही रुग्णालयातून मिळत नसल्याबाबत नाराजीही व्यक्त केली.

 
यावेळी कपिल शेटके यांनी रुग्णालयामधील सुविधांबाबत वरिष्ठांकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही केला. अखेर आमदार आवाडे यांनी प्रशासनातील गंभीरता लक्षात घेऊन हजेरीच्या नोंदी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहण्याबाबतही सुनावले. दरम्यान, आमदार आवाडे यांनी टेक्निशियन भरतीबाबत आरोग्य विभागाचे उपसंचालक दिलीप माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने कायमस्वरुपी एक टेक्निशियन देण्याबाबत आदेश दिले आहेत.