मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या इसमावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

इचलकरंजी, सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या पवन मंत्री (वय ४५, रा. कोणार्क अपार्टमेंट जून चंदूर) यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला. कुत्र्यांनी त्यांच्या हाताचा, मांडीचा चावा घेतला असून कुत्र्यांपासून बचाव करताना ते खाली पडल्याने गुडघ्यालाही दुखापत झाली आहे. जखमी मंत्री यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 शाळा, क्लासला जाणारी मुले, पहाटे  फिरायला जाणारे तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांवर भटकी कुत्री घोळक्याने हल्ला करत असल्याने नागरीकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि नागरीकांच्या तक्रारीची दखल घेऊन कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी महापालिकेने त्यांची निर्बीजीकरणाची मोहिम सुरु केली. मात्र, त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. गेल्या महिन्याभरात दाते मळ्यातून क्लासला निघालेल्या शाळकरी मुलीच्या पाठीमागे कुत्री लागल्याने ती इमारतीच्या तळमजल्यात सायकलसह पडून गंभीर झाली असून व्यंकटेश कॉलनीत ६ वर्षाच्या बालिकेवर ३ कुत्र्यांनी हल्ला केला. यासह अनेक ठिकाणी कुत्र्यांनी हल्ला करुन जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी सकाळी महादेवनगरमधील कोणार्क अर्पाटमेंटमधील पवन मंत्री हे पार्कीगमधील वाहन काढत असताना त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यावेळी त्यांच्या हाताचा, मांडीचा कुत्र्यांनी चावा घेतल्याने ते कुत्र्यांपासून बचाव करताना पडल्याने जखमी झाले. त्यांनी आरडाओरडा केल्याने नागरीक जमल्याने भटक्या कुत्र्यांनी पलायन केले.