भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) सध्या तिच्या हटके फलंदाजीमुळे चर्चेत आली आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात दीप्तीने असा एक शॉट खेळला की, सगळेच क्रिकेटप्रेमी थक्क झाले. ऋषभ पंतच्या शैलीत दीप्तीने एक हाताने षटकार ठोकला आणि चाहत्यांनी तिला ‘लेडी ऋषभ पंत’ असं नाव दिलं आहे. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताने 259 धावांचा पाठलाग करताना 124/4 अशी स्थिती झाली होती. त्यावेळी दीप्ती शर्मा मैदानात आली. जेमिमा रॉड्रिग्जसोबत दीप्तीने पाचव्या गड्यासाठी 90 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. जेमिमा बाद झाल्यानंतर ऋचा घोष लगेच बाद झाली, पण दीप्तीने आपलं काम सुरूच ठेवलं आणि भारताला शेवटच्या टप्प्यात विजय मिळवून दिला. दीप्तीने नाबाद 62 धावा केल्या आणि त्यातला एक षटकार सर्वाधिक चर्चेत राहिला.
दीप्तीने लॉरेन बेलच्या एका चेंडूवर डीप मिडविकेटच्या दिशेने जबरदस्त एक हाताने षटकार ठोकला. हा तिच्या खेळीतील एकमेव षटकार होता, पण त्याचा परिणाम सोशल मीडियावर मोठा दिसून आला. अनेकांनी या शॉटची तुलना ऋषभ पंतच्या खेळीशी केली, कारण पंत अशा प्रकारचे एक हाताने षटकार नेहमीच मारत असतो.
सामना संपल्यानंतर दीप्तीने स्पष्टपणे सांगितलं की, हा खास शॉट तिने ऋषभ पंतकडूनच शिकला आहे. “मी सरावात असे शॉट्स नेहमी खेळते. हा शॉट मी ऋषभ पंतकडून शिकले आहे आणि मला ते खूप आवडते,” असं दीप्तीने सांगितलं.
भारताने हा सामना 4 विकेट राखून जिंकत 262 धावा केल्या आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दीप्ती शर्माची खेळी आणि तिचा ‘एक हाताने षटकार’ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. क्रिकेट चाहत्यांनी तिला ‘लेडी ऋषभ पंत’ म्हणून गौरवलं आहे.
