आमदार सुहास बाबर आणि त्यांचे मानस भाऊ तानाजी पाटील यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हाजरे यांना आणि नगररचना विभागाला हाताशी धरून नगरपंचायत प्रारूप विकास आराखड्यात विरोधकांच्याच जागेवर अन्यायकारक आरक्षण टाकून सुड घेतल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत केला.
आटपाडीत (Atpadi) नगरपंचायतीने जाहीर केलेल्या विकास आराखड्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आराखड्याला विरोध केला आहे. त्यानंतर आता भाजपने आरोप केला आहे. पत्रकार बैठकीत नगरपंचायतीच्या आराखड्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी भाजपचे विधानसभा संजोजक विनायक पाटील , तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले , चंद्रकांत दौंडेआणि विकास भुते यांनी आमदार सुहास बाबर आणि तानाजी पाटील यांना लक्ष केले. आमदार बाबर आणि पाटील या दोघांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून विरोधकांच्या जागा शोधून काढून आरक्षणे टाकली आहेत. विशेष म्हणजे स्वतःच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांचा जमिनी मात्र आराखड्याबाहेर ठेवल्या आहेत. नगरपंचायत होऊन तीन वर्षे झाली. तरी अद्याप लोकनियुक्त नगरसेवकाची निवडणूक झालेली नाही. असे असताना तहसीलदार आणि मुख्याधिकारी ही दोन्ही पदे एकाच अधिकाऱ्याकडे देऊन नगरपंचायतीचा एकतर्फी कारभार चालवला जातो आहे. लोकांना विश्वासात न घेता बनवलेल्या आराखड्याचा वापर शिवसेनेची नेतेमंडळी करू लागली आहेत .
