पेठवडगाव, हद्दपार असताना वडगाव शहरात अनधिकृत प्रवेश करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी राजवर्धन बाबासो पाटील, सुयोग पाटील (दोघे रा. पेठवडगाव) यांच्यावर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. फिर्याद पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण सरगर यांनी दिली.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, हद्दपार गुन्ह्यातील आरोपी राजवर्धन पाटील हा सुयोग पाटीलसह टू व्हीलर बेदरकारपणे चालवत होता. वाठार नाका येथे रात्रगस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला परंतु ते दोघे न थांबता बेदरकारपणे मोटारसायकल चालवत होते. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करुन वाठार नाका येथे थांबवून त्यांची चौकशी केली. यावेळी पोलीस व्हिडिओ शुटिंग करत असताना राजवर्धन पाटील याने मोबाईल फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याचा साथीदार सुयोग पाटील यास पोरं बोलावुन घे, आज यांना सोडायचे नाही असे म्हणत मोटारसायकलवरुन जात असताना तुम्हाला बघून घेतो अशी धमकी देवून धक्का मारुन मोटारसायकलवरुन ( नंबर माहीत नाही) पळुन गेला. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक संतोष माने करीत आहेत.
