हातकणंगले,अनेक वेळा मागणी करूनही फक्त आकसापोटी आळते ग्रामपंचायतीने गावामध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविले नाहीत. सातत्याने निधीचे कारण पुढे केल्याने विरोधी महापरिवर्तन विकास आघाडीने संपूर्ण गावात फिरून निषेधात्मक भिक मागो आंदोलन करून सीसी टीव्ही कॅमेरे साठी निधी गोळा केला . गावात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालून लाखो रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेण्याचे सत्र चालु केल्याने या आंदोलनास धार आली होती.
या आंदोलनामध्ये निषेधाचे फलक घेऊन व गणवेश घालून ग्रामपंचायती मधील विरोधी गटाचे नेते जावेद मुजावर, शिरिष थोरात, सद्दाम मुजावर, राम कांबळे, सुरेश आळतेकर, गणेश खटावकर, अशोक आळतेकर, संजयकुमारपाटील, सुभाष करके, आण्णा पाटील, आप्पासो पाटील, विलास कांबळे, सागर तिवडे, तय्यब मुजावर, नंदकुमार कांबळे, शितल शेटे, बाबासो मजलेकर, नरेश चौगुले, आदि पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी झाले होते. रॅली पार कट्ट्यावर आल्यावर प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. यामध्ये गावात गेल्या काही महिन्या पासून प्रचंड कचरा रस्त्याकडेने पडला आहे. गटारी तुडूंब भरल्या आहेत. डेंग्यू, चिकन गुनिया सारखे आजार होऊन अनेकांना त्याचा फटका बसला आहे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच गेल्या महिन्याभरात सात ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत चोर सापडत नसल्याने सुरक्षेसाठी किमान गावात सीसी कॅमेरे बसवण्यात यावेत अशी अनेक दिवसापासूनची मागणी आहे.
