रेंदाळ सरपंचाचा भाजपा प्रवेश स्वतःच्या स्वार्थापोटी, शिवसैनिकांनी केला निषेध…..

प्रत्येक भागात काही ना काही कारणांनी वादविवाद हे होतच असतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदललेली सर्वानीच पहिली. अनेक पक्षप्रवेश देखील झाले. रेंदाळ ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार यंत्रणा राबविली मात्र वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाची नीतिमूल्ये पायदळी तुडवून सरपंच सुप्रिया पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे जेष्ठ नेते शिवाजी पाटील (बापू), रावसाहेब तांबे यांचा घोर अपमान व पक्षाशी गद्दारी केली आहे. ही बाब शिवसैनिकांच्या जिव्हारी लागल्यामुळे सरपंच सुप्रिया पाटील यांचा जाहीर निषेध करीत असल्याचे शहर प्रमुख महिपती पाटील यांनी नमूद केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत असे परखड मत व्यक्त केले. यावेळी बदलत्या राजकीय परिस्थितीवर विस्तृत चर्चा झाली व गावातीत नागरिकांमधून ठाकरे गटाच्या भुमिकेबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पक्षप्रवेशात कोणाचा हात आहे. हे लोक गप्प का? शिवसैनिकांना अनेक प्रसंगी तोंड द्यावे लागत आहे. असे अनेक प्रश्न या बैठकीत मांडण्यात आले.

 निवडणुकीत वैचारिक मतभेद झाल्यामुळे झालेली गटाची विभागणीला यामुळे ब्रेक लागला व दोन्ही गट एकत्र आले आहेत. यापुढे सर्व गतभेद विसरून एकत्र काम करण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी आपली मते मांडली व घडल्याप्रकाराबद्दल आघाडीच्या नेत्यांना प्रश्न विचारत राग व्यक्त केला.

यावेळी शिवाजी पाटील, रावसाहेब तांबे, संभाजी वाघे, शामराव पाटील स्वप्निल मगदूम यांनी सर्वांशी संवाद साधताना अंतर्गत गटबाजी बाजूला ठेवून श्रद्धा, निष्ठा, सत्व, तत्त्व आणि अस्तित्व फक्त शिवसेना, शिवसेना आणि शिवसेना असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी इथून पुढच्या कार्यकाळात गावच्या सर्वांगीण विकासात गावच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय परिक्षेत्रात इथून पुढच्या कार्यकाळात सर्व मतभेद विसरून एकत्र राहून जनतेच्या विश्वासास पात्र असणारी चळवळ उभारण्याचा निश्चय केला.