विटा,खानापूर, आटपाडी, विसापूर मतदारसंघातील खानापूरसह तालुक्यातील सुलतानगादे, भडकेवाडी, आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी (आटपाडी) व तासगाव तालुक्यातील धोंडेवाडी या गावांचे नावे ही आदिलशाहीच्या काळातील व गावचे नाव वाडी असलेने त्या गावांची नावे बदलण्याची मागणी आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिवेशन काळात केली आहे. यात प्रामुख्याने खानापूरचे भवानीपुर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना आमदार सुहास बाबर यांनी सांगितले की, खानापूरसह तालुक्यातील सुलतानगादे, भडकेवाडी, आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी (आटपाडी) व तासगाव तालुक्यातील धोंडेवाडी या गावांचे नावे ही आदिलशाहीच्या काळातील व वाडीच्या नावावरून आहेत. या गावांची नावे बदलण्यासाठी ग्रामस्थांचे अनेक वेळा प्रयत्न सुरू आहेत. तसेच गावांचे नामांतर करण्यासाठी नागरिकांनी एकत्रितपणे येऊन ग्रामसभेमध्ये एकमुखी ठराव देखील घेतले आहेत. तसेच काही गावाचे नाव बदलण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे दाखल केले आहेत.
यामध्ये खानापूरचे नाव बदलून भवानीपूर करावे तसेच सुलतानगादेचे नाव बदलून संगमेश्वर करावे तर भडकेवाडीचे उदयपूर करावे. तसेच आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी (आटपाडी) चे नाव सोनार सिद्धनगर व तासगाव तालुक्यातील धोंडेवाडीचे नाव बदलून किल्लापूर करावे, अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे.
आमदार सुहास बाबर यांनी केलेल्या मागणीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी असलेल्या खानापूर शहरासह तालुक्यातील सुलतानगादे, भडकेवाडी, आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी (आटपाडी) व तासगाव तालुक्यातील धोंडेवाडी या गावांच्या नामांतराचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
