विटा येथील नगरपालिकेच्या एका महिला सफाई कामगाराचा घंटागाडीचा निरीक्षक विठ्ठल मारुती भिसे (रा. नेहरूनगर, विटा) याने विनयभंग केल्याची घटना मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विटा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कार्यालय असलेल्या जिन्याजवळ घडली. याप्रकरणी पीडित महिला सफाई कामगार महिलेने विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
विटा नगरपालिकेत संशयित विठ्ठल भिसे हा घंटागाडीचा निरीक्षक म्हणून काम करतो.
तर पीडित महिला ही कंत्राटी पद्धतीने पालिकेत सफाई कामगार म्हणून काम करीत आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजता पीडित महिला आरोग्य विभागाचा जिना उतरून खाली येत असताना संशयित भिसे याने तिचा हात पकडून तुला नोकरीत कायम करायचे असेल तर माझ्याबरोबर तुला यावे लागेल. नाहीतर तुला कामावरून काढून टाकेन, अशी धमकी देत तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
त्यानंतर पीडित महिलेने त्याच्यापासून सुटका करून घेत थेट पोलिस ठाण्य येऊन घंटागाडीचा निरीक्षक संशयित विठ्ठल भिसे याच्याविरुद्ध फिर्याद दिली. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार संशयित भिसे याच्याविरुद्ध बीएनएस कलम ७४, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार जाधव करीत आहेत.