स्लिमा व महावितरणची आढावा बैठक अनेक महत्वाच्या प्रश्नांवर उद्योजकांची चर्चा

हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहती मधील उद्योगधंद्यांना अखंडीतपणे विद्युत पुरवठा व्हावा तसेच अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्लिमातर्फे महावितरणचे अधिकारी व उद्योजक यांच्यात आढावा बैठक झाली.

 बैठकीत उद्योजकांनी वीज वितरणातील अडी अडचणी मांडल्या. यामध्ये वसाहती मधील बहुतांश जुन्या व नव्या उद्योजकांना लोड वाढवून हवा आहे, त्याकरिता येथील ५ एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर काढून त्या ठिकाणी नवीन १० एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बसवावा अशी मागणी केली. त्यावेळी शिरदवाड सबस्टेशन मध्ये १०एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर आहे तो बसवला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 लक्ष्मी औद्योगिक वसाहतीला वीज पुरवठा करणाऱ्या फिडरची लाईन गेल्या तीन महिन्यांमध्ये वारंवार बंद पडत आहे. या फिडरची लांबी मोठी असल्याने सदर फिडरचे २ फिडर करून त्यावर कोटेड कंडक्टर बसवण्याचे काम येणाऱ्या सोमवारपासून सुरू करण्यात येईल. सबस्टेशनमधून जाणारा विद्यूत पुरवठा कोरोची एजी फीडर येथून शिफ्ट होणार असल्यामुळे काही वेळेस खंडित होणारा विद्युत पुरवठा बंद होणार नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात वसाहतीमधील सर्व फीडर्सची साफसफाई केली जाईल. संपूर्ण वसाहतीचा सर्वे करून ज्या- ज्या ठिकाणी रोड क्रॉस लाईनला गार्डिंग नाहीत ते काम पूर्ण केले जाईल. वसाहती मधील काही फिडरवर व्होल्टेज कमी जास्त होऊन मशीनचे कार्ड्स, कॅपॅसिटर्स, इनवर्टर्स नादुरुस्त होतात व मोठे आर्थिक नुकसान होते. त्यासाठी अशा घटना ज्या ज्या ठिकाणी होतात तेथे प्रत्यक्ष भेटी देऊन अडचणी सोडवल्या जातील.

 विद्युत पुरवठा खंडित झाल्यास बऱ्याचदा सब स्टेशनमध्ये आवश्यक मटेरियल नसल्याने ते उपलब्ध करून विद्युत पुरवठा सुरू करण्यास वेळ लागतो यावर चर्चा होऊन आवश्यक असणारे सीटी/पीटी व इतर साहित्याचा साठा आठवड्या भरात केला जाईल. तसेच ड्राय टाइप सीटी उपलब्ध होण्यास किमान २ महिने लागतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तिळवणी गावांमध्ये नवीन सबस्टेशन उभारणीसाठी जागा हस्तांतरण व पुढील कामे पेंडिंग आहेत ती त्वरित सुरू करावीत अशी मागणी केली त्यावेळी तिळवणीचे सरपंच व आमदारांना भेटून वरील दोन्ही कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.

 बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता वैभव गोंधील, ग्रामीण विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुनील चौगुले, सहाय्यक अभियंता प्रमोद सोनवणे, स्लिमाचे अध्यक्ष डॉ. महेश दाते, कमिटी चेअरमन शिवाजी केसरे व संचालक श्यामसुंदर मर्दा, अजित केटकाळे, विशाल मोरे व सचिव अजय मनवाडे व वसाहती मधील उद्योजक व कर्मचारी, स्लिमाचे पदाधिकारी उपस्थित होते.