पळसखेलमध्ये मधुमक्षिका पालन जनजागृती कार्यक्रम

आटपाडी , तालुक्यातील दिघंची जिल्हा परिषद गटातील पळसखेल येथील राम मंदिरामध्ये मधुमक्षिका पालन जनजागृती कार्यक्रम झाला. ग्रामपंचायत , ग्राम समिती पळसखेल आणि शेती परिवार कल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.

पुण्यातील केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे राहुल काळे या कार्यक्रमाला मार्गदर्शक होते. त्यांनी सांगितले, शेतीमध्ये मधमाशांचे महत्वाचे स्थान आहे. मधमाशा परागीभवन करतात म्हणून फलधारणा होते. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढते. मधुमक्षिका पालनातून मध, मेण आणि रॉयल जेली मिळते. या शिवाय शेतीचे उत्पादन वाढते. आपण खते वापरणे, फवारणी करणे, पिकांना पाणी देणे अशी अनेक कामे आपण शेतात करतो. पण जर फळधारणाच झाली नाही तर या सर्व गोष्टीचा काय उपयोग ? आपला खर्च वाया जाणार, फलधारणेचे काम मधमाशा करतात.

आपल्या शेतात चार ते पाच मधमाशी पालनाच्या पेट्या ठेवा असा आग्रह यावेळी त्यांनी केले. या मधुमक्षिका पालनाने तरुणांना स्वतंत्र व्यवसायही करता येतो. यासाठी खादी ग्रामोद्योग अनुदान देते याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला पळसखेल गावातील शेतकरी व महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक आजीनाथ सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मारुती आबा कुचेकर होते. आभार शेती परिवार कल्याण संस्थेचे राजेश कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश सावंत, नवनाथ सावंत , हरिदास पिसे आणि अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.