जानकी मंगलधाम ते दुधगाव रस्त्याची दुरुस्ती करा

आष्टा, येथील जानकी मंगलधाम ते दुधगाव रोड या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून अपघाताचा धोका आहे त्यामुळे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी,अशी मागणी विश्वराज शिंदे युथ फाउंडेशनच्या वतीने नगरपालिकेकडे केली आहे.यावेळी विश्वराज शिंदे, समीर गायकवाड, पवन गायकवाड, राजेंद्र कोळी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्यावरती दुचाकीस्वारांची दुचाकी स्वारांची वाहतूक अधिक प्रमाणात आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने अपघात होण्याचा धोका आहे. वाहन चालवताना नियंत्रण गमावण्याच्या घटनाही घडत आहेत. विशेषतः ग्रामीण रुग्णालयाजवळील रस्त्याची अवस्था दयनीय बनली आहे. विश्वराज शिंदे म्हणाले, सदर रस्ता नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असून खराब रस्त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून काम हाती घ्यावे. प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते यांना निवेदन दिले. यावेळी रामचंद्र कोळी, वैभव माने, पवन गायकवाड, शुभम शिंदे, उत्कर्ष माने उपस्थित होते.