आमदार जयंत पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा शिंदेप्रेमींचा निर्धार

आष्टा येथे स्व. माजी आमदार विलासराव शिंदे प्रेमी व निष्ठावंतांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी हजारोंच्या संख्येने विलासराव शिंदे प्रेमी व निष्ठावंत उपस्थित होते. या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी वैभव शिंदे म्हणाले, बेरजेचे राजकारण करीत विकास कामे करण्याचे काम जयंत पाटील व विलासराव शिंदे यांनी एकत्रितपणे एका दिलाने केलेली आहेत. आता मात्र विरोधक आम्ही मंजूर केलेल्या कामाचे श्रेय कोणताही कागदोपत्री पुरावा न देता श्रेय लाटत आहेत. नारळ फोडणाऱ्यांना जनतेने कामाचा पुरावा मागितला पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आम्हीच बसवणार तोही दिवसा. येणाऱ्या काळात विरोधकांना जशास तसे उत्तर दिले जाईल. जयंत पाटील गटाकडूनही मान सन्मान मिळाला पाहिजे. निष्ठावंत शिंदे प्रेमींना, कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळालाच पाहिजे. त्यांचा स्वाभिमान दुखावला नसला पाहिजे याची काळजीही संबंधितांनी घेतली पाहिजे.