भारतातील सर्वात मोठा IPO, मुकेश अंबानींच्या निर्णयाने गुंतवणूकदार होणार मालामाल !

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO आणण्याच्या तयारीत आहेत. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, रिलायन्स आपली दूरसंचार कंपनी रिलायन्स जियो इन्फोकॉमचा IPO बाजारात आणणार आहे. IPO म्हणजे कंपनी प्रथमच आपले समभाग सर्वसामान्य गुंतवणूकदारांना विक्रीसाठी उपलब्ध करेल. या अहवालानुसार, रिलायन्स आपल्या जियोमधील केवळ 5% हिस्सा विकण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे कंपनीला सुमारे 6 अब्ज डॉलर म्हणजेच अंदाजे 52 हजार 200 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. जर हे घडले तर हा IPO भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO ठरणार आहे. याआधी हा विक्रम हुंडई इंडियाच्या नावावर होता, ज्याने गेल्या वर्षी 28 हजार कोटी रुपयांचा IPO आणला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स या IPO संदर्भात बाजार नियामक सेबी (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) सोबत चर्चा करत आहे. नियमानुसार कंपनीला किमान 25% समभाग सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करावे लागतात. मात्र, रिलायन्सचे म्हणणे आहे की, बाजारात इतक्या मोठ्या प्रमाणात समभाग खरेदी करणारे गुंतवणूकदार उपलब्ध नाहीत. या IPOमुळे मेटा प्लॅटफॉर्म्स (फेसबुक) आणि अल्फाबेट इंक (गूगल) यांसारख्या मोठ्या कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. या कंपन्यांनी 2020 मध्ये रिलायन्सच्या डिजिटल व्यवसायात 20 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली होती. त्या वेळी जियो प्लॅटफॉर्म्सची किंमत 58 अब्ज डॉलर इतकी निश्चित करण्यात आली होती. जियो प्लॅटफॉर्म्समध्ये रिलायन्सचा डिजिटल आणि दूरसंचार व्यवसाय समाविष्ट आहे.

शेअरच्या किमतीचा अंदाज
काही ब्रोकरेज कंपन्यांनी रिलायन्सच्या शेअरच्या लक्ष्य किमतीत कपात केली आहे. तरीही दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या O2C आणि रिटेल विभागात सुधारणा दिसू शकते. मॅक्वायरीने रिलायन्सच्या शेअरला ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिले आहे आणि त्याची लक्ष्य किंमत 1,580 रुपये निश्चित केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, AGMमध्ये काही सकारात्मक घोषणा होऊ शकतात, ज्यामुळे रिलायन्सच्या शेअरच्या किमतीला आधार मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

रिलायन्स गुंतवणूकदारांना कसा होईल फायदा ?
रिलायन्सच्या या मोठ्या IPOमुळे कंपनीच्या 41 लाख गुंतवणूकदारांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जियोच्या शेअर बाजारातील प्रवेशामुळे रिलायन्सच्या डिजिटल आणि दूरसंचार व्यवसायाला नवीन उंची गाठता येईल. आता सर्वांचे डोळे AGMवर खिळले आहेत, जिथे कंपनीच्या भविष्यातील योजनांचा खुलासा होईल.