माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी समोर आणला होता. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी कृषिमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांनी केली होती. आता माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय. तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषिमंत्री असणार आहेत. आता यावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महायुतीला थेट इशारा दिला आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, कोणतेही मंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्या पदावरील व्यक्ती जबाबदारीने न वागल्यास त्या पदाला न्याय न देऊ शकल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो. तसंच काहीसं कोकाटे साहेबांच्या बाबतीत झालं होतं आणि त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत होता, म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती. सरकारने कोकाटे साहेबांच्या राजीनाम्याऐवजी कृषी खाते काढून क्रीडा खाते देण्याचा निर्णय घेतला.
क्रीडा खाते देखील युवांच्या दृष्टीने महत्वाचे असून या खात्यात काम करताना भूतकाळातील चुका टाळून आपल्या अनुभवाचा योग्य तो वापर करून क्रीडा क्षेत्रास न्याय देतील तसेच नवे कृषिमंत्री दत्ता मामा भरणे शेतकऱ्यांना न्याय देत या खात्याला लागलेले वादांचे ग्रहण दूर करतील, ही अपेक्षा. कोणत्याही खात्यात गलथान कारभार होऊन सर्वसामान्यांना फटका बसत असेल तर संपूर्ण सरकार त्यासाठी जबाबदार असते, त्यामुळे खातेबदल केला म्हणजे आपण सुटलो असा गैरसमज नेतृत्वाने करून घेऊ नये, असा इशारा रोहित पवार यांनी दिलाय. तर, आमचे सर्वच खात्यावर लक्ष राहते आणि राहणार आहे. कोणत्याही मंत्र्यांचा असंवेदनशीलपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही, त्यामुळे सर्वच मंत्री जबाबदारीने वागतील, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
