तारदाळ, खोतवाडी या दोन गावांसाठी जलजीवन मिशन योजनेतंर्गत ५३ कोटीची योजना मंजूर झाली आहे. या योजनेची प्रत्यक्ष कामाची सुरुवात मागील दोन ते अडीच वर्षापूर्वी झालेली असूनदेखील सदर योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. सदर काम पूर्णत्वाची तारीख ३१ मार्च २०२५ होती. तरीही अधिकारी व मक्तेदार यांच्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडले आहे.
त्यामुळे तारदाळ, खोतवाडीच्या ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. मक्तेदार व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाअभावी ही योजना पूर्णपणे रखडली आहे, असा आरोप उपोषणकर्ते विनोद कोराणे यांनी केला आहे. गुरूवार दि. ३१ जुलैपासून छ. शिवाजी महाराज चौक येथे विनोद कोराणे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे…
वेळोवेळी विनोद कोराणे व त्यांच्या शिष्टमंडळाने वारंवार संबंधित मक्तेदार, अधिकारी व जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याशी संवाद साधून यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. या घटनेलाही तब्बल महिना लोटला तरीही जलजीवन मिशन योजनेचे काम जैसे थे आहे. दरम्यान, जीवन प्राधिकरणचे अधिकारी मनिष पोवार, शैलेंद्र सोणलकर, एस. ए उंडाळे यांनी कोणाणे यांची भेट घेऊन चर्चा केली परंतू कोराणे हे आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने उपोषण सुरूच राहिले आहे. या उपोषणाला भेट देवून इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष, कामगार नेते मिश्रीलाल जाजू यांनी पाठिंबा व्यक्त केला तसेच पाणी पुरवठ्यासंबंधी माहिती घेतली.
