शाझिया इक्बाल दिग्दर्शित आणि सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘धडक 2’ (Dhadak 2) हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची टक्कर ‘सन ऑफ सरदार 2’ सोबत झाली, तसंच अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या ‘सैयारा’ चित्रपटानंही याला आव्हान दिलं.
तामिळ चित्रपट ‘परियेरुम पेरुमल’चा रिमेक असलेल्या ‘धडक 2’ कडून बऱ्याच अपेक्षा होत्या. चित्रपटाला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र शनिवारी त्यात थोडी वाढ झाली. ‘धडक 2’ नं तिसऱ्या दिवशी, म्हणजे रविवारी किती कमाई केली, याचे आकडे समोर आले आहेत.
‘धडक 2 नं तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 4.25 कोटी रुपयांची कमाई केली. सैयाराच्या तुलनेत ही खूपच कमी आहे. ‘धडक 2’, 2018 मध्ये आलेल्या ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांच्या ‘धडक’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. चित्रपटाची कथा आणि तृप्ती डिमरी व सिद्धांत चतुर्वेदी यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा होत आहे, परंतु बॉक्स ऑफिसवर तो विशेष कमाल दाखवू शकला नाहीए. चित्रपटाची सुरुवात थोडी संथ झाली होती, परंतु वीकेंडला कमाई वाढली, तरी ती अपेक्षेप्रमाणे नव्हती. ‘धडक 2’ च्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, पहिल्या दिवशी 3.5 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी 7.14 टक्क्यांच्या वाढीसह 3.75 कोटी रुपये चित्रपटानं जमवले.
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘धडक 2’ ने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 4.25 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे.यामुळं ‘धडक 2′ ची तीन दिवसांची एकूण कमाई आता 11.50 कोटी रुपये झाली आहे.’धडक 2’ बॉक्स ऑफिसवर इतर सिनेमांच्या तुलनेत मागे पडला आहे.
