महसूल सप्ताहानिमित्त आष्टा अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी धाडशी निर्णय घेत कामांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील अनेक पाणंद रस्ते शेतकऱ्यांना खुले झाले आहेत. आष्टा-वाळवा रस्ता परिसरात असणाऱ्या एडताक पांडू ते फकीर सर पाणंद रस्ता (Panand Road) चाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर खुला करण्यात आला. अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचे मध्यस्थी आणि प्रयत्नामुळे हा रस्ता खुला झाला. या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. पाणंद रस्ता खुला केल्याबद्दल परिसरातील शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे, तहसीलदार राजशेख लिंबारे यांचे आभार मानले.
यावेळी उपजिल्हाधिकारी सविता लष्करे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना सातबारा उतारे वाटप करण्यात आले. आष्टा तहसील कार्यालयाच्या पुढाकाराने शहर परिसरात महसूल सप्ताह साजरा होत आहे. या निमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. यावेळी राजारामबापू साखर कारखान्याचे माजी संचालक विराज शिंदे, माणिक शेळके, अर्जुन माने, दत्तात्रेय मस्के उपस्थित होते.. जिल्हाधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांचे आदेशानुसार उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या मार्गदर्शनानुसार, तहसीलदार राजशेखर निंबारे यांच्या प्रयत्नातून हा रस्ता खुला करण्यात आला.
