विट्यात ‘वाढती गुन्हेगारी ‘ विषयावर बैठक घ्यावी

वाढती नशेखोरी व गुन्हेगारी या विषयावर सर्व लोकप्रतिनिधी , विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधीकारी , सामाजिक कार्यकर्त्यांची लवकरच बैठक लावा, अशी सूचना आपण विट्याच्या तहसीलदार आणि पोलिस प्रशासनाला केल्याची माहिती युवा नेते, विटा पालिकेचे नगरसेवक अमोल बाबर यांनी दिली.

विट्यात ड्रग्ज कारखाना प्रकरण आणि त्यातून वाढती नशेखोरी व गुन्हेगारी या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निखिल सुतार यांनी काल सोमवारी येथील महसूल भवनासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन केले. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अमोल बाबर आले होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वानी राजकारणविरहित या विषयाकडे पहिले पाहिजे. याबाबत आपण गंभीर आहोत. लवकरच याबाबत बैठक लावावी अशी सूचना केली आहे.

दरम्यान, निखिल सुतार म्हणाले,विट्यात अलीकडच्या काळात नव्याने पडत असणारे ड्रग्ज प्रकरण व वाढलेली नशेखोरी , वाढती गुन्हेगारी हि इथून पुढच्या काळात फोफावू नये, तसेच या नशेखोरीचे विद्यार्थी आणि विटेकर नागरिक शिकार होऊ नयेत म्हणून आपण हे आंदोलन केले. भविष्यातील पिढी बरबाद होऊ नये म्हणून प्रत्येकाने जागरूक राहिले पाहिजे, असेही सुतार यांनी सांगितले.

आंदोलनस्थळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, माजी नगरसेवक अमर शितोळे, समीर कदम, रणजित पाटील,राहुल शितोळे, अनिल राठोड , बबन हारुगडे , अमीर तांबोळी , भालचंद्र कांबळे , मंगळूरचे उपसरपंच अभिजित पाटील , मिलिंद कदम, मंथन मेटकरी , संजय लकडे, श्रीधर जाधव यांच्यासह अनेकांनी प्रत्यक्ष भेटून पाठिंबा व्यक्त केला.