इचलकरंजी, शहापूर परिसरातील खणीला पूर्णपणे केंदाळने वेढा घातला आहे. केवळ गणेशोत्सव काळापुरते लक्ष देणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाचे वर्षभर दुर्लक्ष असते. त्यामुळे खण परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तेव्हा प्रशासनाने शहापूर खण कायमस्वरूपी केंदाळमुक्त करण्यासाठी ठोस कार्यवाही करून खण परिसर स्वच्छ व करावे
कोल्हापुरातील रंकाळा तलाव वर्षभर स्वच्छ असतो. कधी केंदाळ आल्यास तात्काळ काढण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने मोहिम हाती घेतली जाते. तसेच रंकाळा परिसराचे मोठे सौंदर्यीकरण करण्यात आला आहे. त्यामुळे सायंकाळनंतर रंकाळा परिसर गर्दीने फुलून गेलेला असतो. तेव्हा रंकाळाच्या धर्तीवर खणीचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. सुंदर बनवावा, अशी मागणी होत आहे.
शहापूर परिसरात सर्वात मोठ्या असलेल्या खणीची मोठी दुरावस्था होती. मात्र, माजी आम. सुरेश हाळवणकर यांच्या पुढाकाराने सदर खणी परिसराचे तसेच खणीची स्वच्छता करणेत आली. त्याचबरोबर खण परिसरात स्ट्रिट लाईट, नागरिकांच्यासाठी फुटपाथ, ओपन जीम आदी सोयी-सुविधा करण्यात आली. तसेच वर्षभरातूनएकदा घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी सुविधा करण्यात आली. त्याला नागरिकांनी तसेच सार्वजनिक मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महानगरपालिकेच्या माध्यमातून केवळ वर्षातून एकदा खणीची स्वच्छता केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. याप्रकारामुळे खणीमध्ये मोठ्या प्रमाणात केंदाळ साचले आहे.
वाढत्या केंदाळामुळे खणीतील जलचर प्राणी मृत्यूमुखी पडून दुर्गंधी पसरत आहे. तसेच केंदाळामुळे डांसांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाढत्या केंदाळाबाबत लोकप्रतिनिधींसह नागरिक वारंवार तक्रार करतात. मात्र, महानगरपालिका प्रशासन तात्पुरती मलमपट्टी करत असल्याचा आराप नागरिकांतून केला जात आहे.
केवळ गणेश विसर्जनापुरते शहापूर खणीकडे न पाहता सदरची खण वर्षभर स्वच्छ व सुंदर रहावी, यासाठी आयुक्त पल्लवी पाटील यांनी ‘लक्ष देवून ‘शहापूर खण’ स्वच्छ व सुंदर ठिकाण करावे, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.
