ही शान कुणाची , विट्याच्या राजाची अशा घोषणा देत जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘ विट्याचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे शहरात आगमन झाले . यामुळे संपूर्ण विटा शहर गणेशमय झाले आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. सकाळपासून गणेशभक्त विट्याच्या राजाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. सायंकाळी मूर्ती शहरात दाखल होताच प्रमुख मार्गावर भाविकांची गर्दी उसळली . ढोल ताशांचा गाजर आणि फुलांचा वर्षावात मूर्तीचे स्वागत करण्यात आले. मुंबईतील लालबागच्या राजाची प्रकृती असलेला, नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांची श्रद्धा असलेल्या विट्याच्या राजाची ओळख केवळ विटा शहरापुरती मर्यादित नसून , परिसरातील असंख्य भाविकांच्या मनात रुजलेली आहे. मूर्तीच्या स्वागतासाठी महिला, लहान मुले, जेष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटांतील गणेशभक्तांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला . यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर, कार्याध्यक्ष आमदार सुहास बाबर , उपाध्यक्ष अभिजित पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विट्याच्या राजाच्या आगमनाने शहर गणेशमय
