बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांसह बोकड फस्त

टेंभुर्णी , माढा तालुक्यातील कन्हेरगांवात बिबट्याने पुन्हा एकदा दहशत पसरविली असून १६ ऑगस्ट रोजी शनिवारी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला करून तीन शेळ्या व एक बोकड जागीच फस्त केले. या घटनेने शेतकरीवर्ग पुरता हवालदिल झाला असून बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

कन्हेरगांव येथे तीन- चार महिन्यांपासून बिबट्याचा अधूनमधून धुमाकूळ होत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांचे शेळ्या ,वासरे, गायी,रेडके यांच्यावर हल्ला झाला आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी बाळूमामा चौकातील गोडसे वस्ती येथे स्थानिकांना बिबट्या दिसून आला होता. त्यानंतर गोडसे वस्ती शेजारील सुर्वे वस्ती येथेही दोन दिवसांपूर्वी विलास दत्तू भरगंडे यांच्या शेतातील वस्तीवर बिबट्याने भर दुपारी शेळ्यांवर हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यासदृश्य प्राण्याने तीन शेळ्या व एक बोकडाला ठार केले आहे. यामध्ये शेतकऱ्याचे ६०हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती समजताच कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देऊन नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे.