उपराष्ट्रपती निवडणुकीत रंगणार South vs South सामना

उपराष्ट्रपती (Vice Presidential) निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया ब्लॉकने आपापल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. एनडीएकडून तामिळनाडूचे सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर इंडिया आघीडीने मूळचे आंध्र प्रदेशचे असणारे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचं नाव जाहीर केलं आहे. यामुळे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक दक्षिण विरुद्ध दक्षिण अशी झाली आहे, ज्यामुळे ही निवडणूक आणखी रंजक बनली आहे, उमेदवारांच्या घोषणेनंतर दक्षिण भारतातील पक्षांसमोर अडचण निर्माण झाली आहे.

एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. ते मूळचे तामिळनाडूतील कोइम्बतूरचे आहेत. प्रत्यक्षात, भाजपने राधाकृष्णन यांना उमेदवारी देऊन द्रमुकची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु इंडिया आघाडीने राजकीय पार्श्वभूमी असलेले माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना निवडणुकीत उमेदवारी देऊन भाजपाला त्यांच्यात जाळ्यात अडकवलं आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे रहिवासी असलेल्या सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर एनडीएने मित्रपक्ष मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय, माजी मुख्यमंत्री जनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेससह तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसलाही अडचणीत आणलं आहे.

द्रमुकचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवार केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, एक प्रामाणिक, स्वतंत्र आणि नागरी स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते म्हणून त्यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात संवैधानिक मूल्ये अबाधित ठेवली आहेत. आपल्या संस्थांवर दबाव असताना, त्यांची उमेदवारी लोकशाही आणि संविधानाच्या आत्म्याचे रक्षण करण्याचा आपला सामूहिक संकल्प आणखी मजबूत करते.

एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांनी आज सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचे प्रस्तावक स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, एनडीए शासित राज्यांचे केंद्रीय मंत्री यांच्यासह सुमारे 160 खासदार उपस्थित होते, ज्यामध्ये 20 प्रस्तावक आणि 20 समर्थक होते. मंगळवारी संसद भवनात झालेल्या एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी राधाकृष्णन यांना एकमताने पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते.

इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी 21 ऑगस्ट रोजी अर्ज दाखल करतील. उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक 9 सप्टेंबर रोजी होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी झाल्यानंतर उपराष्ट्रपतींचे नावही जाहीर केले जाईल.