शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी एकत्र येत बेस्ट पतपेढीची निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणूकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मनसे ठाकरे गट युतीचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. या निवडणूकीत शशांक राव (Shashank Rao) यांनी घवघवीत यश मिळवले. त्यांच्या पॅनलचे 14 उमेदवार निवडून आले आहेत. तसेच प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार निवडून आले आहेत. निवडणूक जिंकताच शशांक राव यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले की, ‘आता भूमिका स्पष्ट झाल्या आहेत भाजप पक्ष म्हणून आम्ही या निवडणुकीत उतरलो नव्हतो. ही निवडणूक कामगारांची होती बेस्ट वर प्रेम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती. याचं राजकीय करण उबाठा आणि मनसेने केले. प्रत्येक गोष्टीच राजकारण करण याच फळ त्यांना मिळालं आणि हाती भोपळा आला. 0 + 0 हा शून्यच हे मी आधीही म्हणालो होतो. आज मुंबईचा विजय झाला, मुंबईकरांचा विजय झाला, मराठीचा विजय झाला, कामगारांचा विजय झाला आणि भाजपचा विजय झाला.
पुढे बोलताना शेलार म्हणाले की, ‘मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून मी आज जाहीर करतो की, मुंबई महानगरपालिकेच्या स्टार प्रचारकांची मोठी यादी जाहीर होईलच, पण स्टार प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांची नावे मी आज जाहीर करत आहे. या दोघांनीच बेस्ट च्या निवडणुकीत या दोन्ही भावांच्या पक्षाला मुंबईकरांचा आशीर्वाद कुठे आहे हे दाखवून दिले. मी या दोन्ही पक्षांना सांगतो की, आधी या दोघांशी निपटा आणि मग माझ्याकडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या.’
बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले की, ‘शशांक राव यांचं पॅनल निवडून आलं त्यांचं अभिनंदन करतो. 14 लोक निवडून आले. या पुढे बेस्ट पतपेढीचं काम ते हाताळतील आणि कामगारांना न्याय देतील ही अपेक्षा करतो. लाड यांचं देखील अभिनंदन करतो. ज्यांचा पराभव झाला त्यांनी पैशांचा वापर झाला असा आरोप करणं चुकीचं आहे. युद्ध अजून संपलेलं नाही. कारण अजून आम्ही जिंकलेलो नाही.’
