विटा(Vita) गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाला शूरवीर बहिर्जी नाईक यांचे नाव देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही आमदार सुहास बाबर यांनी दिली आहे. बाणुरगड येथे शूरवीर बहिर्जी नाईक पराक्रम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी आमदार सुहास बाबर बोलत होते.
आ. सुहास बाबर म्हणाले, शूरवीर बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर दलाचे प्रमुख होते. त्यांच्या पराक्रमामुळे स्वराज्याची गुप्त माहिती सुरक्षित राहिली आणि अनेक विजय शक्य झाले. त्यांच्या शौर्य, चातुर्य आणि निष्ठेमुळे स्वराज्याचा पाया अधिक मजबूत झाला.
बाबर म्हणाले, बाणुरगड येथील शूरवीर बहिर्जी नाईक समाधी स्थळासाठी स्व. आमदार अनिलभाऊ यांनी २ कोटी निधी दिला. यापुढे ही मी विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.
गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाला शूरवीर बहिर्जी नाईक यांचे नाव देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे. खानापूर नगरपंचायत नगराध्यक्ष पद खुले असताना समाजातील सौ. जयश्री मंडले यांना संधी दिली आणि भविष्यातही समाजासाठी आणि समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. शूरवीर बहिर्जी नाईक यांच्या अद्वितीय शौर्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजाने एकजुटीने प्रयत्न करावेत, असेही आमदार बाबर यांनी यावेळी आवर्जून सांगितले. या प्रसंगी मोहन मदने, दौलत शितोळे, अंकुश जाधव, नगराध्यक्ष जयश्रीताई मंडले, अमोल मंडले, विद्याधर मंडले, सचिन मंडले, अनिकेत शिंदे, उमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
