आष्टा प्रभाग तीन रचनेबाबत हरकत

आष्टा (Ashta) नगरपरिषदेच्या सन २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत प्रभाग ३ बाबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विनय साधू कांबळे यांनी हरकत घेतली आहे. याबाबत त्यांनी आष्टा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना हरकत अर्ज दिला आहे.  

कांबळे म्हणाले, प्रभाग ३ ची रचना पूर्णपणे चुकीची आहे. या प्रभागात आनंद कॉलनी, गौतम हौसिंग सोसायटी, सिद्धार्थ नगर, वारे वसाहत येथे पूर्णपणे एस. सी. समाजाचे नागरिक वास्तव्यास आहेत. गौतम हौसिंग सोसायटी मधील प्रियांका किराणा स्टोअर्स पासून आत डांगे कॉलेजच्या भिंतीला लागून असलेली घरे सोडली तर संपूर्ण भाग हा प्रभाग चारला जोडला गेला आहे. नकाशाची तोडमोड करून कोणाच्यातरी फायद्यासाठी सदर भाग प्रभाग तीन मधून वगळण्यात आला आहे. या प्रभागात १३०० मतदार एस सी समाजाचे होते. त्यातील ४०० मतदार इतरत्र हलवले आहेत. अहिल्यानगर प्रभाग ३ मध्ये ठेवले आहे. अहिल्यानगर ते प्रियांका किराणा स्टोअर्स ते डांगे कॉलेज कमानी पासून आतील भाग एकसंघ आहे. तो पूर्वी प्रमाणे प्रभाग ३ मध्ये राहिला पाहिजे. नवीन प्रभाग रचनेत दलित वस्तीचा भाग तुकड्या तुकड्यात विभागणी करून इतर भाग जोडल्याने भौगोलिक संलग्नता विभागली गेली आहे. त्यामुळे प्रशासकीय व निवडणूक प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. ही विभागणी संविधानातील अनुच्छेद २४३ टी तसेच महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम प्रभाग रचना नियमांचे उल्लंघन करणारी व दलित वस्ती प्रतिनिधित्व यावर अन्यायकारक आहे. यामुळे दलित वस्ती सुधारणा निधीद्वारे विकास करणे अशक्य होणार आहे.