इस्लामपुरातील गवंडी टोळी तीन जिल्ह्यांतून हद्दपार

खुनीहल्ला , जमावाने मारहाण करणे, दहशत निर्माण करणे आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या येथील मानव गवंडी टोळीला कोल्हापूर , सांगली , सातारा जिल्ह्यांतून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी हा हद्दपारीचा आदेश दिला.

टोळीचा म्होरक्या मानव शंकर गवंडी (वय २४ वर्ष , रा. आंबेडकर नका, इस्लामपूर ), ओमप्रकाश मुक्ताजी बोमशेट (२१ रा. खांबे मळा ,इस्लामपूर ), विनोद उर्फ बाल्या रामचंद्र माने (२२, रा. वडार गल्ली , इस्लामपूर ), श्रीयुग ज्ञानदेव ताटे ( २०,रा. आंबेडकर नका, इस्लामपूर), रोशन रमेश रजपूत (२०,रा. केएनपी नगर ,इस्लामपूर), अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. मानव गवंडी हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. गणेशोत्सव , आगामी सण , उत्सव , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर शांतता , कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. मानव गवंडी टोळीविरोधात २०२२ ते २०२५ या कालावधीत गंभीर गुन्हे दाखल आहेत. इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी गवंडी टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. पोलीस निरीक्षक संजय हारुगडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.