सांगली, अथणी तालुक्यासह ग्रामीण भागात चेनस्नॅचिंग करणाऱ्या तिघांच्या आंतरराज्य टोळीला अथणी व ऐगळी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख रुपये किंमतीचे सहा तोळे सोने जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. हे तिघेही चोरटे सांगली जिल्ह्यातील लिंगनूरमधील आहेत.
अटक केलेल्या संशयितांमध्ये प्रदीप परसू नाईक (वय १९, रा. बस कोडी वसाहत लिंगनूर, ता. मिरज), अंकुश रमेश लोहार (वय २०, रा. शिंदे माळ, लिंगनूर, जि. सांगली) व राजेंद्र ऊर्फ राजू अशोक नाईक (वय २१, रा. बसरीकोडी वसाहत लिंगनूर, जि. सांगली) यांचा समावेश आहे.
डॉ. गुळेद म्हणाले, गेल्या महिन्यात ऐगळी पोलिस ठाण्यात चेनस्नॅचिंगचा गुन्हा दाखल झाला होता. गौरव्वा बसाप्पा कलशेटी (रा. हालळ्ळी, ता. अथणी) या हालळी बसथांब्यापासून तेलसंग रस्त्याने चालत आपल्या शेताकडे निघाल्या होत्या. यावेळी मागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व बोरमाळ हिसडा मारुन चोरुन नेले.
तिघा संशयितांवर मिरजमध्ये एक तर कर्नाटकातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये आठ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये ऐगळीत ४, अथणी २, रायबाग व कुडचीत प्रत्येकी १ असे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून सहा लाखांचे सहा तोळे सोने, दोन लाखांच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
