खानापूर;लेझीम, ढोल,- ताशाचा निनाद… दुसरीकडे डीजेचा दणदणाट

विटा,(vita)गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या आरोळ्या , लेझीम,ढोल-ताशांचा गजर, दुसरीकडे डीजेचा दणदणाट , सीओ टू पेपर ब्लास्टरचे चौका चौकात उडणारे फवारे आणि बेधुंतेने नाचणारी तरुणाई अशा एकूणच वातावरणात शहर, तालुक्यात श्री गणरायाला निरोप देण्यात आला.

सकाळपासून गणरायाला निरोप देण्याची लगबग सुरु होती. सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत ढोल, ताशाच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. विटा शहराचे आकर्षण असलेल्या विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीची सायंकाळी चार वाजता आरती करण्यात आली. त्यानंतर मंडळाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला.

सुरवातीला कोल्हापूरच्या पथकाने अघोरी नृत्यप्रकार सादर केला. तब्बल सत्तर ढोल,तीस ताशे आणि बारा ध्वज असे या विट्याचा राजा मंडळाचे वैशिष्ट्य होते. दर्शन घेण्यासाठी घेण्यासाठी गणेशभक्तांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. ठिकठिकाणी स्वागत आणि मूर्तीवर पुष्पवृष्टी केली जात होती. महिला औक्षण करून
गणरायाचे दर्शन घेत होत्या. आठ तास मिरवणुकीने राजाचे विसर्जन करण्यात आले.

मंडळाचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, कार्यवाह आमदार सुहास बाबर , उपाध्यक्ष पप्पू दाजी कदम यांच्यासह सर्व बाबर कुटुंबीय आणि पांढरा सलवार – कुर्ता परिधान केलेले शेकडो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे आमदार सुहास बाबर यांनी स्वात; ढोल वाजवला , त्यामुळे कार्यकर्त्यांना आणि पाहणाऱ्यांना एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली पाहायला मिळाली.

विटा शहरात पालिकेने कराड रस्त्यालगत नेवरी नका येथे चिरवळ ओढा , लोकनेते हणमंतराव पाटील शाळा नंबर दोन या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम हौद उभारले होते.