कुंभोज (ता. हातकणंगल) येथे आठवडी बाजाराच्या जागेसाठी ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. कुंभोज येथील गट नंबर १९०३ या मिळकतीचे एकूण क्षेत्र ४ हे. ०६ आर असे आहे. यापैकी अंदाजे ०.८२ आर. जमीन पूर्वीपासून आजतागायत पडसर व खुली अशा स्थितीत आहे.
उर्वरित जागेत गावतलाव अस्तित्वात आहे. सदरची जमीन ही ग्रामपंचायत कुंभोज यांच्या मालकी व कब्जे वहिवाटीची असून प्रस्तुतची मिळकत ग्रामपंचायत कुंभोज यांना ता. ३० सप्टेंबर १९५५ साली, फेरफार ५३१९ याप्रमाणे तत्कालीन जिल्हाधिकरी यांच्या आदेशाने कब्जे वहिवाटीत मिळाली आहे. या प्रकरणाचे सर्व सात-बारा, फेरफार उतारे, आदेश व गावात बाजार भरविण्यासंदर्भात सद्यस्थितीला येणाऱ्या समस्या व अडचणी जिल्हाधिकारी यांच्या समोर यापूर्वी निवेदनासह सादर केल्या होत्या. त्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी २४ डिसेंबर २०२३ रोजी बाजार भरवण्यासाठीचे आदेशही दिलेले आहेत परंतु, आम्ही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फेब्रुवारी २०२५ रोजीपासून पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची आजअखेर यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही कुंभोजमधील गट नंबर १९०३ या जमिनी शेजारीच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत यांच्याकडून पोलीस बंदोबस्त आदेश पारित होत नाही व हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहणार असल्याची माहिती अजित देवमोरे यांनी दिली.
उपोषणस्थळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिनंदन पाटील यांनी वैद्यकीय तपासणी केली. हातकणंगले पोलीस ठाण्याचे गोपनीयचे मदन मदाळे, पोलीस पाटील महंमद पठाण, तलाठी राजेंद्र माळी, हातकणंगले सर्कल पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.
