सांगोल्यात लोक अदालत ५६७ प्रकरणे निकाली

सांगोला येथील दिवाणी न्यायालयात नुकतेच राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीमध्ये ५६७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधून १ कोटी ५९ लाख ५० हजार ६२८ रुपयांची तडजोड करण्यात आली तर पाच वर्षांहून जुनी एकूण सात प्रकरणे लोक अदालतीत निकाली निघाली. सांगोला दिवाणी न्यायालयाच्या आवारात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दोन पॅनेल तयार करण्यात आले होते. पॅनल क्रमांक एकचे प्रमुख दिवाणी न्या. पी. आर. कुलकर्णी व पॅनेल वकील म्हणून ॲड . पी. एस. येलपले यांनी काम पाहिले. त्यांच्याकडे दिवाणी व फौजदारी न्यायालयातील दाखल प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती.

तसेच पॅनेल क्रमांक दोनचे प्रमुख सहदिवाणी न्या. एस. एस. साळुंखे यांनी काम पाहिले. पॅनेल क्रमांक दोनकडे दाखलपूर्व प्रकरणे व आयपीसी १९८८ ची प्रकरणे तसेच गुन्ना कबूल केलेली प्रकरणे ठेवण्यात आली होती. कौटुंबिक वादातून विभक्त झालेल्या दोन प्रकरणांमध्ये समेट घडवून त्यांना पुन्हा एकत्र जोडण्याचे काम या लोक अदालतीमध्ये करण्यात आले. तसेच दाखलपुर्व (बैंक, पतसंस्था, नगरपालिका, ग्रामपंचायत, एमएसईबी यांच्या वसुलीची) एकूण ४५८ प्रकरणे निकाली निघाली आहेत. तसेच एकूण ५६७ निकाली प्रकरणांमधून १ कोटी ५९ लाख ५० हजार ६२८ रुपयांची तडजोड करण्यात आली. पाच वर्षात जुनी एकूण सात प्रकरणे या लोक अदालतीत निकाली झाली.

लोक अदालत यशस्वी करण्याकरिता विधिज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड . एम. एन. दाळे, वकील संघाचे सर्व पदाधिकारी व सर्व विधिज्ञ यांनी सहकार्य केले. तसेच सांगोला न्यायालयाचे सहायक अधीक्षक ए. एस. बपनळ्ळी, विधी सेवा समिती कर्मचारी, वरिष्ठ लिपिक टी. एम. डोईफोडे, वाय. जी. तारे यांच्यासह सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.