शिवाजीनगर येथे घराला शॉर्टसर्किटमुळे आग

पेठवडगाव वडगाव-लाटवडे रोडवरील शिवाजीनगर येथील नायकवडी यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. वडगावच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.

गणेश नायकवडी यांचा दोन माजली आरसीसी बंगला आहे. या बंगल्यामध्ये संकल्प भानुसे भाडेकरू म्हणून राहण्यास आहेत. संकल्प यांचे विद्या कॉलनी येथे गेले होते. दरम्यान, घराच्या पाठीमागच्या बाजूने किचनमधून धूर येताना शेजाऱ्यांनी बघितले. काही वेळात या आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान, काही तरुणांनी अग्निशामक दलास याची माहिती दिली. अग्निशामक दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घरात प्रवेश करून आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा मारा केला; परंतु अडचणीच्या खोल्या असल्याने त्यांना आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घरातील सिलिंडर बाहेर काढल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. दरम्यान, या आगीमध्ये घरातील मौल्यवान वस्तू जाळून खाक झाली. आग आटोक्यात आणण्यासाठी दोन अग्निशामक दलाचे निशिकांत आयरेकर,चेतन धनवडे , अंकुश कदम, गणेश नाईकवडी , वैभव शिंदे, प्रमोद गुरव, सुनील मदीक उपस्थित होते.